पती दुसरे लग्न केल्याने नाराज झालेल्या पत्नीने दोन मुलांसह केली आत्महत्या ....

Foto
हैदराबाद : नवऱ्याने अन्य महिलेशी लग्न केल्यामुळे नैराश्यातून बायकोने मुलांसह आयुष्याची अखेर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २९ वर्षीय विवाहितेने आपल्या दोघा मुलांसह जीवनयात्रा संपवली. हैदराबादमधील राहत्या घरी तिघे जण मृतावस्थेत सापडले. एस बनोथ श्रावंती असे मयत महिलेचे नाव आहे. दहा आणि बारा वर्षांच्या मुलांसह तिने जीव दिला

श्रावंतीचा विवाह तेरा वर्षांपूर्वी बोडा प्रवीण याच्याशी झाला होता. दाम्पत्यामध्ये अनेकदा लहान मोठ्या कारणांवरुन खटके उडत असत. अशातच प्रवीणने दुसऱ्या महिलेशी विवाह केला. श्रावंती नवऱ्याचं घर सोडून वारंगल येथील आई-वडिलांच्या घरी राहायला गेली होती. दोन मुलांनाही तिने सोबत घेतलं होतं. मात्र कुटुंबातील वडीलधार्‍या मंडळींनी तिची समजूत काढल्यावर सोमवारी रात्री ती हैदराबादला प्रवीणच्या घरी परतली.


त्या दिवशी काय घडलं?
मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास प्रवीण कामावरुन परत आला. मुख्य दरवाजा आतून लॉक होता. अनेकवेळा दरवाजा ठोठावूनही आतून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून तो आत गेला. त्यावेळी त्याला भयंकर दृश्य पाहायला मिळालं. श्रावंती आणि दोन्ही मुलं मृतावस्थेत होती. अडीच वाजताच्या दरम्यान पोलिसांना खबर मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाल्याचं बालानगरचे एसीपी पी नरेश रेड्डी यांनी सांगितलं. आमच्या टीमने तिघांच्या बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवल्या आहेत. प्राथमिक दृष्ट्या, महिलेने आयुष्य संपवल्याचा संशय आहे. दोन्ही मुलांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच कळेल, असं पोलीस म्हणाले.

पोलिसांनी सांगितलं की, मुलांच्या बॉडी त्यांच्या आईसोबत लटकलेल्या अवस्थेत आढळल्या. मात्र महिलेने टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी मुलांची हत्या झाली होती का, याचाही तपास सुरु आहे. कुकटपल्लीच्या डीसीपी रिती राज यांनी सांगितले की, बीएनएसच्या कलम १०८ अंतर्गत पती प्रवीणविरुद्ध जीव देण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला जाईल. नेमका घटनाक्रम काय घडला, कुठल्या कारणामुळे श्रावंतीला जीव देण्यास भाग पडले याचा शोध सुरु असून अधिक पोलीस तपास चालू आहे.